मुंबई- काही हिरे बाजार विश्लेषकांच्या मते, सुरतमधील 'डायमंड बोर्स'चा मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांवर जास्त काही परिणाम होणार नाही. तर महाराष्ट्रातील व्यवसाय गुजरातकडे नेण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सुरत हिरे व्यापाऱ्यांचे केंद्र-सुरत हे मागील अनेक वर्षापासून हिरे व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखलं जातं. सुरतमधील हिरे हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. परंतु हे हिरे विदेशात निर्यात करण्यासाठी सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याकारणाने हा व्यवसाय मुंबईतून केला जात आहे. हिऱ्यांची निर्मिती जरी सुरतमध्ये होत असली तरीसुद्धा याची जगभरातील देवाण-घेवाण ही मुंबई मार्फतच होत आहे. परंतु आता सुरतमध्ये सुरत डायमंड बोर्स नावाचं मोठं व्यापार केंद्र सुरू करण्यात आलं आहे. अनेक व्यापाऱ्यांनी मुंबई सोडून सुरतकडं जाण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जातंय.
सर्व सुविधांनी 'डायमंड बोर्स' आहे सज्ज-सुरतमध्ये बांधण्यात आलेल्या 'डायमंड बोर्स' इमारतीमध्ये हिरे व्यापाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी हे मुंबईतील आपला व्यवसाय बंद करून सुरतला स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन सुरतमध्ये सरकारकडून जमिनी खरेदी केल्या आहेत.
मुंबईतील हिरे कामगारांचा प्रश्न-आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सुरतच्या व्यवसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागायचे. नवीन कार्यालय उघडण्याबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. परंतु आता सुरत 'डायमंड बोर्स'मध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच लवकरच सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत. सुरतचे हिरे व्यापारी आता मुंबईऐवजी सुरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील, अशी माहिती 'सुरत डायमंड बोर्स' समितीचे सदस्य दिनेश नावडिया यांनी दिली आहे. तसेच यामुळे मुंबईतील कामगारांच्या नोकऱ्यांवरसुद्धा गदा येणार आहे. दरवर्षी तब्बल ८० हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या हिरे व्यापारामुळे महाराष्ट्र सरकारचा कोट्यावधी रुपयांचा करसुद्धा बुडणार असल्याची चर्चा आहे.
उद्योग धोरण कुठे चुकतंय का?मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला स्थलांतरित होत असल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीसुद्धा 'एक्स' सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या म्हणाल्या आहेत की, मुंबईतील हिरे उद्योग हा पूर्णतः गुजरातला जात आहे. मुंबईतून सुरतमधील 'डायमंड बोर्स' इमारतीमध्ये अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होणार आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उद्योग हा बाहेर जात आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व सुद्धा कमी करण्याचा भाजपाकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं उद्योग धोरण याबाबत कुठे चुकते का? याचा आढावा घेणे फार गरजेचं आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळेच राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार आता राज्याबाहेर जात आहे. ही खेदाची बाब असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हिरे उद्योग मुंबईतून जात असल्याची एक्सवर पोस्ट 'बसा बोंबलत' असा हॅशटॅग वापरून सरकारवर टीका केली.
मुंबईतील बहुतेक हिरे व्यापारी हे सुरतला जाणार नाहीत. याचं कारण येथील व्यवसाय आणि दुकान बंद करून सुरतला जाऊन तिथे दुकान खरेदी करणे व व्यवसाय करणं त्यांना परवडणार नाही- हिरे तज्ज्ञ हार्दिक हुंडिया