मुंबई Mumbai Cyber Crime : दक्षिण सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमांगी झुनझुनवाला (वय 47) हिनं तक्रार दाखल केली होती की, आर्या नावाच्या मुलीनं तिला व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवून यूट्यूबवर व्हिडिओ लाईक करण्याच्या अर्धवेळ नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर स्वीकारून झुनझुनवालानं व्हिडिओ लाईक करण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला यासाठी तिला पैसे दिले गेले. त्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिला फी आकारून टास्क ऑफर करून एकूण 55.35 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिलीय.
सायबर सेलचा तपास सुरू : फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हेमांगी झुनझुनवाला यांनी सायबर सेलकडे याप्रकरणाची तक्रार नोंदवली. त्यानंतर दक्षिण सायबर सेलनं तपास केला असता झुनझुनवालानं ट्रान्सफर केलेल्या 55.35 लाख रुपयांपैकी 14.50 लाख रुपये नागपुरातील बँक खात्यात जमा झाल्याचं समोर आलं. हे बँक खाते 'कांचन जनरल स्टोअर आणि होलसेलर' यांच्या नावावर होतं. त्यानंतर पोलिसांनी नागपुरला जात बँकेतील खातेदार कांचन मेश्राम यांची चौकशी केली. तेव्हा कांचन मेश्रामची मैत्रिण सलमा अली हिनं मेश्रामच्या कागदपत्रांचा वापर करून बँकेत खातं उघडल्याचं उघड झालं. चौकशीदरम्यान कांचन मेश्राम यांनी सांगितलं की, सलमा अलीनं माझ्या कागदपत्रांचा वापर करून बँक खातं उघडलं. त्याचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला.
बँक खात्यात तीन कोटी रुपये जमा :आपल्या कागदपत्रांचा वापर चुकीच्या कामांसाठी करण्यात आल्याचं लक्षात येताच कांचन मेश्राम यांनी 15 ऑक्टोबरला सलमा सुजात अली (वय 38) आणि गजेंद्र एकुणकर (वय 39) यांच्याविरोधात नागपुरातील पार्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसंच पोलिसांनी या बँक खात्याची माहिती घेतली असता दोन दिवसात तब्बल तीन कोटी रुपये यात जमा झाल्याचं समोर आलं.