मुंबई Mumbai Crime :अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनिट प्रभारी संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. गस्त घालत हे पथक माहीमजवळ पोहोचले. तेव्हा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ फूटपाथवर एक व्यक्ती उभा होता. त्याची देहबोली काहीशी संशयास्पद वाटत होती. त्यामुळं अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी तेथे वाहन थांबवून सदरील व्यक्तीची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकड असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत एमडी ड्रग्ज आढळून आले. त्यामुळं पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी कार्यालयात आणले.
आरोपीला अटक :बेनेडिक्ट फ्रान्सिस गॉडगिफ्ट सायप्रियन उर्फ डिंकू (वय 37) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपी डिंकूकडून जप्त केलेल्या पावडरचा एक छोटा नमुना एका पॅकेटमध्ये घेण्यात आला होता आणि उर्वरित पावडर दुसऱ्या पॅकेटमध्ये ठेवून सीलबंद करण्यात आले होते. या पावडरची तपासणी केल्यावर ते एमडी ड्रग्ज असल्याचं निष्पन्न झालं.