मुंबई : १२ वर्षांपासून मुंबईत भाजीविक्री करणारा व्यक्ती हा चक्क अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी निघाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करत त्यांच्याकडून १.१८ कोटी रुपयांचे चरस जप्त केलंय. नेपाळमार्गे हे चरस मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी कारवाईची माहिती दिलीय. ते म्हणाले, बोरिवली पश्चिमेतील एका ठिकाणी दोन जण चरस आणण्यासाठी जात असल्याची माहिती एएनसीच्या कांदिवली युनिटला मिळाली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर दोन संशयितांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून चरस जप्त करण्यात आलं. रोहित गुप्ता आणि लक्ष्मण जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी गावचे रहिवासी आहेत. जयस्वाल गेल्या १२ वर्षांपासून मुंबईत राहत असून, भाजीविक्री करतो.
नेपाळ सीमेवर बोलावले : अमली पदार्थ विरोधी सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्ता याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने, त्याची अर्जुन नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. चरस व्यवसायात भरपूर पैसा असल्याचे अर्जुननं गुप्ता याला सांगितले. अर्जुनने गुप्ता याना शकील नावाच्या व्यक्तीचा नंबर दिला. शकीलनम गुप्ता याला नेपाळ सीमेजवळ बोलावून चरस दिला. तो चरस घेऊन गुप्ता रेल्वेने मुंबईत आला. त्याचा मित्र जयस्वाल याच्या मदतीने मुंबईत विकण्याचा प्रयत्न करत होता.
ड्रग्ज जम्मूहून नेपाळमध्ये : अमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले की, २० डिसेंबरला रोहीत गुप्ता रेल्वेने मुंबईला आला. लक्ष्मण जयस्वाल याच्यासोबत चरस विकण्यासाठी ग्राहक शोधत होता. अमली पदार्थ विरोधी सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींकडून जप्त केलेली चरस उच्च दर्जाची आहे. हे चरस हिमाचल किंवा जम्मूमध्ये आढळते. अधिकाऱ्याने सांगितले की, हे ड्रग्ज जम्मूहून नेपाळमध्ये नेले होते. तेथून बिहारमध्ये आणले गेले.