मुंबईMumbai Crime News : लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Police Station) मार्ग पोलिसांनी एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी पायजमाच्या दोरीने मृताचा गळा दाबून हत्या केली. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.30 वाजता धनजी स्ट्रीट, एलटी मार्ग पोलिस स्टेशन हद्दीतील फूटपाथवर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचा संदेश पोलिसांना मिळाला होता. एलटी मार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला जीटी हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
खून केल्याची दिली कबुली : शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता विजय मंडल असं मृताचे नाव असून तो हातगाडी चालवतो अशी तपासात माहिती निष्पन्न झाली. या प्रकरणाचा तपास करणार्या पोलिसांनी प्रदीप मंडल (वय 28) आणि सूरज प्रामाणिक (वय 28) या दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता दोघांनीही विजय मंडलचा खून केल्याची कबुली दिली.