मुंबई :पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार (Shooting Incident ) करण्यात आल्याची घटना कुर्ला पश्चिम मालकडवाला कंपाउंड येथील जय शंकर चौक येथे घडली आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या गोळीबारामुळे कुर्ल्यात एकच खळबळ उडाली असून, गोळीबारानंतर पळून गेलेल्या गुंडाचा शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Crime News)
गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार: या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष लक्ष्मण पवार (४०) आणि गणेश पवार अशी हल्लेखोरांची नावे आहेत. आशिष पवार हा सराईत गुन्हेगार असून कुर्ला, विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर १० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर काही गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आलेला आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी त्याला तडीपार केले होते. (Firing in Kurla Mumbai )
दोघात शाब्दिक वाद झाला : कुर्ला पश्चिम मसराणी लेन येथील जय शंकर चौक या ठिकाण राहणारा संतोष पवार सोबत आशिष पवार याचे जुने वैर आहे. आशिष पवार हा देखील त्याच परिसरात राहणारा असून बुधवारी रक्षाबंधन असल्यामुळे आशिष हा राखी बांधण्यासाठी जय चौक येथे आला होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास संतोष आणि आशिष हे समोरासमोर आले व दोघात शाब्दिक वाद झाला. या वादात आशिष सोबत असलेल्या गणेशने संतोषवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, संतोष तेथून पळून गेला. पळून जात असताना आशिषने स्वतःजवळील रिव्हॉल्व्हर काढून संतोष पवारच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष हा थोडक्यात बचावला.
घटनास्थळावरून काढला पळ: या गोळीबाराच्या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवशी परिसरात एकच खळबळ उडाली. या गोळीबाराची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस आल्याचे कळताच आशिष आणि गणेश यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आशिष आणि गणेश यांचा शोध घेण्यात येत आहे.