मुंबई Mumbai Crime News : स्कुल व्हॅन चालकानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात समोर आलीय. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी स्कूल व्हॅन चालकाला अटक केलीय. तसंच टिळक नगर पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅन चालकाविरोधात बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळं पालकांमध्ये मात्र घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. तुषार भालेराव असं गुन्हा दाखल झालेल्या स्कूल व्हॅन चालकाचं नाव आहे.
निर्जनस्थळी नेत केलं अश्लिल वर्तन : चेंबूर येथील टिळकनगर परिसरात अल्पनयीन मुलगी कुटुंबियांसोबत राहत असून टिळक नगर परिसरातील एका शाळेत मुलगी पाचव्या इयत्तेत शिकते. घरापासून शाळा काही अंतरावर असल्यानं ती एका खासगी स्कूल व्हॅननं शाळेत ये-जा करत होती. 19 ऑक्टोबरलाही ती नेहमी प्रमाणे स्कूल व्हॅननं शाळेत गेली होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास ती शाळेतून घरी येत असताना ती स्कूल व्हॅनमध्ये एकटीच होती. यावेळी आरोपीनं गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातील एका निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेला लावून तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं. ही बाब तिच्या लक्षात येताच तिनं तत्काळ आरडाओरडा केला. यानंतर आरोपीनं तिला धमकावत तिच्या घरी सोडलं.