मुंबई Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेनं एक किलो एमडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक केली असून, ड्रग्जची किंमत एक कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे जुहू चर्च रोड या परिसरातून वांद्रे अमली पदार्थ विरोधी पथकानं उच्च प्रतीचा 'हायड्रो गांजा' आणि 'चरस' या अमली पदार्थांची तस्करी करुन व्यवसाय करणाऱ्या ४ गुन्हेगारांस अटक केली. कारवाईत एकूण १ कोटी १८ लाख किमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला.
42 वर्षीय व्यक्तीकडून एक किलो एमडी ड्रग्ज जप्त : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने शनिवारी कासिम मोहम्मद शिवानी (वय 42) नावाच्या व्यक्तीला एमडी ड्रग्जसह अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनिट 3 चे अधिकारी गस्त घालत असताना लोअर परळ (पूर्व) च्या लोढा पार्किंगजवळ पोहोचले. तेव्हा त्यांना एक संशयित व्यक्ती तिथं उभा राहून कोणाची तरी वाट पाहत असल्याचं दिसलं. ती व्यक्ती संशयास्पद असल्यानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडं जाऊन चौकशी केली. मात्र त्यानं योग्य उत्तर दिलं नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक किलो एमडी ड्रग्ज आढळून झाले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला बुधवारपर्यंत (19 ऑक्टोबर ) पोलीस कोठडीत पाठवले आहे. याविषयी अधिक माहिती देत एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंं की, कासिम हा मोहम्मद अली रोड येथील रहिवासी असून तो घड्याळ दुरुस्तीचं काम करतो. या अगोदरही कासिमवर एनडीपीएस कायद्यान्वये अमली पदार्थ विरोधी सेल वरळी युनिट आणि डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.