मुंबई Mumbai Crime News : बँक मॅनेजर असलेल्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानं मुंबईत खळबळ उडाली. या खूनप्रकरणी 24 वर्षीय मारेकरी प्रियकराला मुंबईतील साकीनाका पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. शोएब शेख असं अटक करण्यात आलेल्या मारेकरी प्रियकराचं नाव आहे. तर एमी उर्फ अमित सिंग उर्फ अमित रवींद्र कौर असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. शोएबनं बँक मॅनेजर प्रेयसीचा खून केल्यानंतर हॉटेलमध्ये मृतदेह टाकून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र साकीनाका पोलीस ठाण्यातील जवानांनी सतर्कता दाखवून पाळण्याच्या बेतात असलेल्या मारेकऱ्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
चारित्रावरील संशयातून केला प्रेयसीचा खून :मारेकरी शोएब शेख हा साकीनाका इथला राहणारा आहे. त्याची प्रेयसी एमी ही मुंबईतील एका बँकेत मॅनेजर होती. मात्र एमीच्या चारित्र्यावर शोएब शेखला संशय होता. शोएबनं सोमवारी नवी मुंबईतील हॉटेलमधील एक रूम बुक केली. परंतु तिचं इतर कोणाशी तरी अफेअर असल्याचा शोएबला संशय आला. त्यामुळं आरोपी शोएबनं रागाच्या भरात हॉटेलच्या रूममध्ये तिचा गळा दाबला आणि घटनास्थळावरुन पळ काढला, अशी माहिती यावेळी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
पळून जाण्याआधीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या :एमीचा खून केल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र शोएबनं काहीतरी गंभीर गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यानं दिली. त्यावरुन साकीनाका पोलिसांनी आरोपी शोएब शेखला सापळा रचून मंगळवारी दुपारी दोन वाजता पकडलं, अशी माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.
हॉटेलमध्ये आढळला प्रेयसीचा मृतदेह :साकीनाका पोलिसांच्या चौकशीत आरोपी शोएब यानं त्याची प्रेयसी एमी उर्फ अमित सिंग उर्फ अमित रवींद्र कौर (वय 35) हिचा खून केल्याचं उघड झालं. मारेकरी प्रियकर शोएबनं तिचा मृतदेह नवी मुंबईतील हॉटेलमध्ये टाकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानं दिलेल्या माहितीवरून साकीनाका पोलिसांनी तुर्भे पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी तुर्भे पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली असता, एमीचा मृतदेह आढळून आला. मृत एमी ही सायन कोळीवाड्यात राहायची, अशी माहिती साकीनाका पोलिसांनी यावेळी दिली. त्यामुळं पोलिसांनी मारेकरी शोएब शेखविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 302 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. मारेकरी शोएब आणि त्याची प्रेयसी एमी हे दोघंही अविवाहित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुढील तपास सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हेही वाचा :
- प्रेयसी व्हिडिओ कॉलिंगवर इतरांशी बोलते म्हणून गळा आवळून खून; प्रियकराला अटक
- प्रियकराने मित्रांच्या मदतीने केली प्रेयसीची हत्या, देहूरोडमधील घटना
- Kurla Murder Case : 'त्या' मृतदेहाचे उकलले गूढ ; मैत्रिणींच्या मदतीने संपवले पतीच्या प्रेयसीला, 3 महिलांना अटक