मुंबई Mumbai Crime News : आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या सह्या करुन अज्ञात आरोपीनं विमा कंपनीची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या अधिकाऱ्यानं दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पैसे झारखंडमधील आरोपीच्या खात्यात हस्तांतरित झाल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली आहे.
- खोट्या सह्या करुन फसवणूक :दादर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या अधिकाऱ्यानं तक्रार देताना सांगितले की, कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या खोट्या सह्या करुन अज्ञात आरोपीनं कंपनीकडून एक कोटी रुपये घेतले. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेची फसवणूक झाली आहे.
बनावट कागदपत्रे वापरुन केला अर्ज :नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या आदेशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर अज्ञात आरोपीनं एका व्यक्तीच्या बँक खात्यात एक कोटी रुपये हस्तांतरित केले, अशी माहिती दादर पोलिसांनी दिली. आरोपीनं 25 ऑक्टोबरला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत बनावट कागदपत्रे वापरुन अर्ज केला. त्यानंतर 28 ऑक्टोबरला पैसे हस्तांतरित केले, असं तक्रारदारांनी पोलिसांना सांगितलं.