मुंबई Online Fraud : शिवडी परिसरातील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं इंस्टाग्रामवर स्वघोषित ज्योतिषाची जाहिरात बघितली. त्यानंतर महिला या बनावटी जाहिरातीदारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर 16 हजार रुपये गमावून बसली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात 2 डिसेंबर रोजी भारतीय दंड संविधान कलम 419, 420 आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क आणि 66 ड अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
जाहिरातीत काय होतं? : महिलेनं इंस्टाग्रामवर एक जाहिरात बघितली. ज्यात लिहिलेलं होतं की, समस्या नाही असा माणूस नाही, उपाय नाही अशी समस्या नाही, भारताचे सुप्रसिध्द ज्योतिषी जोशी गुरुजी आपल्या अनेक समस्यांचं फोनवरच निवारण करतील. एक फोन आपलं भाग्य बदलू शकते', अशी जाहिरात सागर जोशी या इंस्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आली होती. तसंच या जाहिरातीसह व्हॉट्सअॅपची लिंकही देण्यात आली होती.
अशी झाली फसवणूक : जाहिरात बघून महिलेनं दिलेल्या लिंकवर क्लिक केलं. लिंक उघडताच तिला 151 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर महिलेनं ते पैसे ऑनलाइन पद्धतीनं सेंड केले. पैसे दिल्यानंतर महिलेला फोन आला. तिला तिची समस्या विचारण्यात आली. महिलेला तिची व पतीची कुंडली दाखवायची होती. कुंडली बघितल्यानंतर 'तुमच्या कुंडलीत गंभीर दोष असल्यानं तुमचं तुमच्या पतीसोबत जमत नाही. तसंच या समस्येचं निवारण करण्यासाठी 16 हजार रुपये खर्च येईल', असंही सांगण्यात आलं. हे ऐकून महिला त्यांच्या जाळ्यात फसली. तिनं दुसऱ्याचं दिवशी 16 हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवले.