मुंबई Mumbai Crime News : सध्या राज्यभरात अमली पदार्थ तस्करी प्रकरणं चांगलेच गाजत आहेत. मुंबई, पुणे जिल्ह्यात यासंबंधित मोठी टोळी कार्यरत असल्याचं बोललं जात असून अनेक ठिकाणी अमली पदार्थच्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा या संबंधित कारवाई करण्यात आलीये. महसूल गुप्तचर महासंचालनालय विभागानं (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन युगांडाच्या महिलांना अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे एका महिलेनं चक्क सॅनिटरी नॅपकीनमध्ये अमली पदार्थ लपवून मुंबईत आणलं आहे.
सॅनिटरी पॅड्स आणि गुद्दाशयात लपवलं ड्रग्ज :अत्यंत सावधपणे नियोजित केलेल्या कारवाईत, डीआरआय मुंबई विभागाच्या अधिकार्यांनी दोन युगांडाच्या महिलांकडून अमली पदार्थांची तस्करी केल्याचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयनं केलेल्या या कारवाईत आरोपी असलेल्या महिलांनी अमली पदार्थ तस्करी करताना वापरलेली आश्चर्यकारक मोडस ऑपरेंडी उघडकीस आली आहे. सॅनिटरी पॅड्स आणि गुद्दाशयात या महिला अमली पदार्थ लपवून आणत होत्या. यापूर्वी पर्दाफाश करण्यात आलेल्या सिंडिकेटमध्ये आरोपींनी अमली पदार्थ बॅगेत लपवणं किंवा अमली पदार्थ सेवन करुन पोटात लपवणं आदीसारख्या मोडस ऑपरेंडीचा वापर केला होता. मात्र यावेळी सॅनिटरी नॅपकिन्सच्या आत अमली पदार्थ लपविल्यानं नवीन मोडस ऑपरेंडी डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे.