मुंबई Mumbai Crime News : बालक तस्करीच्या रॅकेटचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेनं आणखी तीन महिला आरोपींना अटक केलीय. तसंच त्यांच्याकडून 29 दिवसांच्या मुलाची सुटका करण्यात आलीय. या महिलांकडून आणखी गुन्हे उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अडीच लाख रुपयांत मुलाची विक्री : युनिट नऊच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, सुटका करण्यात आलेल्या 29 दिवसांच्या मुलाची अडीच लाख रुपयांना विक्री करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या तीन महिलांपैकी दोन महिलांनी मूल विकलं होतं आणि एका महिलेनं ते मूल विकत घेतलं होतं. सुटका करण्यात आलेलं हे मूल कोणाचं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक म्हणाले की, सुरुवातीच्या अटकेनंतर आम्ही या अवैध बाल तस्करीला प्रोत्साहन देणाऱ्या एजंट आणि मध्यस्थांचा शोध सुरु केलाय. याप्रकरणी आम्ही आतापर्यंत एकूण अकरा जणांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनोबर चिपळूणकर हा रत्नागिरीचा रहिवासी असून त्यानं हे मूल विकत घेतलं होतं. तबस्सुम सैन वय 42 आणि सफिया अली वय 42 या दोघींनी मुलाला विकलं होतं. सैन ही चिपळूणची रहिवासी आहे तर अली ही ग्रँट रोड मुंबई इथली राहणारी आहे.