मुंबई :मुंबईच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बोरिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याच्या घरात चोरी झाल्याबाबतची तक्रार बोरिवली पोलीस ठाण्यात दिली. घरातील तिजोरीतून रोख रक्कम एक लाख 90 हजार रुपये आणि साडेचार लाखांचे दागिने चोरी गेल्याची ही तक्रार होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर एपीआय तडवी, एएसआय सावंत, कॉन्स्टेबल रबिल शेख, योगेश कदम, विक्रांत मेहेर, चंद्रकांत जगताप, प्रवीण तड्डे, लेहंगे यांच्या पथकाने चोरीच्या घटनेच्या तपासाला सुरुवात केली.
Mumbai Crime News: बोरिवली पोलिसांनी सीसीटीव्हीवरून केली दोन आरोपींना अटक; 90 हजार रुपये आणि साडेचार लाखांचे दागिने केले होते लंपास - Borivali police
बोरिवली पोलिसांनी दोन शातीर चोरांना अटक करून एका चोरीच्या घटनेचा उलगडा केला आहे. ते दोन चोर आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या अंधारात पाईप किंवा झाडावरून चढून घराच्या खिडकीतून प्रवेश करून चोरी करत होते. संतोष चौधरी, झिमाद सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्हीही चोरांना न्यायालयाने आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सीसीटीव्हीची मदत घेऊन तपास : पोलिसांनी सोसायटीच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची मदत घेऊन तपासाला सुरुवात केली. तपासात ही घटना ज्या इमारतीत घडली, त्या इमारतीच्या शेजारी एक झाड असल्याचे समोर आले. त्याच्या मदतीने चोरट्यांनी 4 तारखेला फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून आले. चोरी करून पुन्हा चोर त्याच झाडावरून खाली उतरताना देखील दिसत आहेत. अगोदरच तिथे त्या चोराचा एक मित्र दुचाकी घेऊन पळून जाताना देखील सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आले.
अनेक चोरीचे गुन्हे दाखल : बोरिवली पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. ते दोघे अंधेरी आणि जोगेश्वरीचे रहिवासी आहेत. झाडावर चढून चोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चौधरी (२३) आहे. त्याच्यावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. झिमाद सय्यद (रा. २ जोगेश्वरी, ओशिवरा, अंधेरी) असे अन्य साथीदार चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर सहा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने त्यांना आठ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटने संबंधित आणि इतरही काही गुन्ह्यासंबंधित तपास बोरिवली पोलीस करत आहेत.