मुंबई :आरटीआय कार्यकर्ता आणि तक्रारदार शकील अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकारातून दाखल केलेल्या गुन्ह्याविषयी आरोपपत्र कधी दाखल केले, याविषयी माहिती काढली असता ट्रॉम्बे पोलिसांनी खोटी माहिती दिली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल बांगर यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिसांना तक्रारदार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल बांगर यांना दिरंगाईबद्दल तसेच गैरवर्तनाबाबत मेमो दाखल केला आहे. लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे.
10 लाखांची आर्थिक फसवणुक :संतोष शिवपुजन गुप्ता आणि पत्नी अंजू गुप्ता या दाम्पत्याने संगनमताने त्यांच्या मालकीची मानखुर्द येथील सदनिका तक्रारदार शकील यांना स्वत: विकत असल्याचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत विक्री करण्याचा करारनामा केला. त्याच्याकडुन 10 लाख रूपये घेतले. तसेच त्यांनी सदरच्या सदनिकेवर उज्जीवन बँकेकडून 22 लाख 60 हजार रुपये रक्कम घेऊन रूम बँकेकडे तारण ठेवली आहे. त्याचप्रमाणे सदरची सदनिका तक्रारदार शकील यांच्या ताब्यात व नावावर न करता 10 लाखांची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी तक्रार शकील शेख यांनी ट्रॉम्बे पोलिसांना केली. तक्रारदार यांनी दिलेल्या दिलेल्या तक्रारीवरून संतोष गुप्ता व अंजु संतोष गुप्ता यांच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 420, 406 , 34 अन्वये गुन्हा दाखल करून 19 जुलै 2022ला आरोपींना अटक करण्यात आली होती.