मुंबई : Mumbai Crime News : दोन समाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत. त्यांचे मंदीर, मस्जिद, चर्च हे टार्गेट आहेत, अशा आशयाचे अनेक अर्ज भोईवाडा पोलीस ठाणे ( Bhoiwada Police Station) तसेच मुंबई शहरातील इतर अनेक पोलीस ठाण्यांना प्राप्त होत होते. त्यामुळे अशी खोटी माहिती पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अल्पवयीन मुलाला भोईवाडा पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं आहे.
भारतात दंगली घडवण्याचा डाव : याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 505 (1) (ब), 506 (2), 182 आणि 34 कलमांन्वये नोंद आहे. या गुन्ह्याची अधिक माहिती अशी की, भोईवाडा पोलीस ठाणे तसेच, मुंबई शहरातील इतर अनेक पोलीस ठाण्यांना अनेक अर्ज प्राप्त होत होते. त्यात अर्जदार अनेक लोकांची नावे आणि मोबाईल नंबर देऊन PFI या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून ते भारतात दंगली घडवण्याचा डाव रचत आहेत, अशी माहिती अर्जाद्वारे अज्ञात व्यक्तीनं दिली होती.
मंदीर, मस्जिद आणि चर्च टार्गेट :दोनसमाजात दंगली घडवण्याचा मोठा कट रचत आहेत. त्या दहशतवाद्यांचे मंदीर, मस्जिद आणि चर्च हे टार्गेट आहेत. PFI संघटनेचे सदस्य हे जम्मु काश्मीर येथून मुंबईत आले आहेत. ते सदस्य मुंबई शहर आणि उपनगरात दंगली घडवणार आहेत. ते गावी प्रशिक्षण घेऊन मुंबईत घातपात घडवण्यासाठी आले आहेत, असे अर्जात आणि पत्रात अज्ञात व्यक्तीनं नमूद केलं होतं.