मुंबई :कोरोनाच्या काळात बीएमसीकडून करण्यात आलेले व्यवहार ईडीनंतर मुंबई पोलिसांच्या रडारवर आले आहेत. रेमेडेसिवीरची अव्वाच्या सव्वा दरानं खरेदी केल्याच्या प्रकरणात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाईचा फास आवळला जात आहे. कोरोना काळात जादा दराने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उनावणे यांनी स्वत: तक्रार दिली.
मुंबई महापालिकेनं रेमडेसिवीर इंजेक्शन हे इतर सरकारी यंत्रणांपेक्षा 900 रुपयांनी जास्त किमतीच्या दरात खरेदी केल्याचे उघडकीस आले होते. या उघड झालेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक चौकशीला सुरुवात देखील केली होती. या चौकशीत जवळपास 65 हजार रेमडेसिवीर चढा भावाने खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पाच कोटी 96 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी मध्यवर्ती खरेदी विभागातील तत्कालीन अधिकारी, मायलान लॅबोरेटरीचे डायरेक्टर आणि इतर यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 406, 420, 120 आणि 34 अन्वये आग्री पाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक चौकशी होणार आहे.
- बृहन्मुंबई महापालिकेने कोविड काळात केलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या खरेदीची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ईडीने पंधरा ठिकाणी छापेमारी केली होती. महापालिकेच्या भायखळा येथील कार्यालयातून जप्त केलेल्या कागदपत्रानुसार टेंडर प्रक्रिया, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था, रेमडेसिवीरची खरेदी अशा वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.