मुंबई -पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोप पत्र न्याायलायत सादर केले आहेत. पूर्वीचे व आताचे मिळून एकूण 4 हजार 996 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
काम देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती
चित्रपट सृष्टीत काम करण्यास इच्छुक तरुणींना काम देण्याचे बहाण्याने अश्लिल चित्रफिती बनवून त्या एका अॅपवर प्रसारीत करणाऱ्या पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीबाबत माहिती प्राप्त झाल्याने 4 फेब्रुवारी, 2021 रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने मालवणी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान नऊ आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात 1 एप्रिल, 2021 रोजी न्यायालयात एकूण 3 हजार 529 पानांचे दोषारोपत्र दाखल करुन कलम 173 (8) अन्वये पोलीस तपास करत होते.
पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे
पॉर्न केसमधील मुख्य सूत्रधाराचा मालमत्ता कक्षामार्फत तपास सुरू असताना तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब व जप्त कागदपत्रांवरुन एका अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले. न्यायालयाकडून सर्च वॉरन्ट प्राप्त करून राज कुंद्रा यांच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली. त्यामध्ये पॉर्न फिल्मबाबत बरेच पुरावे प्राप्त झाले. त्याआधारे रिपू सुदन कुंद्रा उर्फ राज कुंद्रा व त्याचे विआन इंडस्ट्रीज कंपनीतील आय.टी. हेड रायन जॉन थॉर्प यांना या प्रकरणी 19 जुलै, 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी दोघांना अश्लील चित्रफीत बनवून, ऑनलाइन प्रसारीत करुन, पैसे मिळवून व्हॉट्सअॅप व इ-मेल नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती.