मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 10 ने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून किरीट सोमय्या यांनी व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओचा तपास करण्याची मागणी केली होती.
किरीट सोमय्यांनी दिले होते पोलीस आयुक्तांना पत्र :भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी 17 जुलैला मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 10 चे पथक कथित व्हिडिओच्या सत्यतेचा तपास करणार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी, तांत्रिक तज्ज्ञ (IT expert ) आणि सायबर टीमची मदत घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप :भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रात किरीट सोमय्या यांनी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक कथित व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतल्याचे नमूद केले आहे. अशाप्रकारच्या अनेक कथित व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले. अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत, असेही या पत्रात नमूद केले आहे. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशाप्रकारचा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही कथित व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विधिमंडळातही किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद :एका वृत्तवाहिनीवर किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दाखवण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळातही उमटले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील या कथित व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमा अथवा रॉ या यंत्रणेकडे तपास द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर कथित व्हिडिओ व्हायरलचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केल्यानंतर त्यावर मुंबई पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे.
हेही वाचा -
- Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओची होणार सखोल चौकशी - देवेंद्र फडणवीस
- kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ