मुंबई - सध्या वादात सापडलेले क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वझे यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसवर लिहिलेल्या कथित मजकुरामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या मजकुरामुळे अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहकारी खोट्या प्रकरणात अडकवत असल्याचा दावा या मजकुरात करण्यात आला आहे. वझे यांनी ठाण्यातील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. 19 मार्चला त्यावर सुनावणी होणार आहे.
सहकाऱ्यांकडून खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे?
सचिन वझे यांनी त्यांच्या व्हाट्सअॅप स्टेटसला ठेवलेल्या मजकुरानुसार, 3 मार्च 2004ला त्यांच्याच खात्यातील काही अधिकाऱ्यांनी सीआयडीच्या माध्यमातून त्यांना एका खोट्या केसमध्ये अडकवून अटक केली होती. अगोदरचा इतिहास पाहता पुन्हा एकदा अशा प्रकारची गोष्ट होत असून माझ्याच खात्यातील काही सहकाऱ्यांनी मला चुकीच्या प्रकरणांमध्ये पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे त्यामध्ये दिसत आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये फरक असला तरी या अगोदरच्या प्रकरणातून सावरण्यासाठी मला 17 वर्षे संयम, माझे आयुष्य आणि पोलीस खात्यात सेवा द्यावी लागलेली आहे. मात्र, आता पुढची 17 वर्ष हे सगळे सहन करण्यासाठी माझ्याकडे सेवा आणि संयम या दोन्ही गोष्टी नसणार आहेत. त्यामुळे माझ्या मते या जगाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असल्याचेही वझे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटले आहे. आता या स्टेटसवरुन तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. यासंदर्भातही चौकशी होण्याची शक्यता आहे.