मुंबई : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईमध्ये पहिला रुग्ण मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. गेल्या तीन वर्षात मुंबईत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या आहेत. या लाटा रोखण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या 17 व्हेरियंट आणि सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रोन या तीन व्हेरियंटचा सर्वाधिक प्रसार झाला होता. सध्या मुंबईत एक्स बीबी, बीक्यू, बीए, बी एन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
या व्हेरीयंटचे रुग्ण अधिक :पालिकेने 1 जानेवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीमधील 141 नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवले होते. याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. 141 पैकी एक्सबीबीचे 71 रुग्ण म्हणजे 50 टक्के, बीक्यूचे 23 रुग्ण म्हणजे 16 टक्के, सीएचएचचे 11 रुग्ण म्हणजे 8 टक्के, बीएचे 14 रुग्ण म्हणजे 10 टक्के, बीएनचे 8 रुग्ण म्हणजे 6 टक्के, तर अन्य व्हेरियंटचे 14 म्हणजे 10 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.
या आधी या व्हेरियंटचे रुग्ण : मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार आहे?, तो किती प्रमाणात आहे?, यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये पहिल्यांदा या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात कोरोना, अल्फा, केपा, नाइंटिन ए, द्वेन्टि ए, डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ओमायक्रोन, स्टेल्थ बी 2, ओमायक्रोनचे उपप्रकार असलेल्या BA 2.74, BA 2.75, BA 2.76, BA 2.38, BA 5 , BA 2.38.1, BA 4 या व्हेरियंटचेही रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या अडीच वर्षात मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या तब्बल 17 व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रोन या विषाणूंमुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक झाला आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी का? : मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी पॉजिटीव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातात. कोरोना पॉजिटीव्ह तसेच जे रुग्ण लवकर बरे होत नाहीत अशा रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसाठी पाठवले जातात. यामुळे रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग आहे याची माहिती मिळते. अशी माहिती मिळाल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करता येतात. तसेच एखाद्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा :Water Shortage In Nashik: नाशकात ऐन उन्हाळ्यात पाणीकपात; पालकमंत्री दादा भुसे यांचे संकेत