मुंबई: मुंबईत आज १९ सप्टेंबररोजी कोरोनाच्या ४०२९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६६ रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४९ हजार ११५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १००९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२२५ दिवस इतका आहे. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१४ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या घटतेय :मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली.