महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा होतोय कमी - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईतील कोरोना मृत्यूचा दर 5.44 टक्के इतका आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

Corona Patients
कोरोना रुग्ण

By

Published : Aug 25, 2020, 6:01 PM IST

मुंबई- मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. तेव्हा पासून मुंबईत रोजच 40 ते 50 हुन अधिक मृत्यू होत होते. यावरून महानगरपालिकेवर टिका केली जात होती. मात्र, गेल्या चार दिवसात मृतांचा आकडा कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनामुळे 20 मृत्यू झाले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा होत आहे कमी

महानगरपालिकेकडून कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेतली जात असल्यानेही मृत्यूंची संख्या कमी होत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची मुंबई हॉटस्पॉट बनली आहे. 11 मार्चला मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात मुंबईत कोरोनाचे 1 लाख 37 हजार 91 रुग्ण आढळून आले आहेत तर, 7 हजार 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे 50 ते 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या व इतर आजार असलेल्या रुग्णांचे आहे. 23 ऑगस्टपर्यंत मुंबईत कोरोनामुळे 7 हजार 419 मृत्यू झाले असून त्यापैकी 6 हजार 160 मृत्यू हे 50 वर्षाहून अधिक वय असलेल्या रुग्णांचे झाले आहेत. मुंबईतील कोरोना मृत्यूचा दर 5.44 टक्के इतका आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

मृतांचा आकडा कमी करण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न -

मुंबईत रोज होणारे कोरोना मृत्यू हा चर्चेचा विषय बनला आहे. मुंबईत गेल्या पाच महिन्यात रोज 40 ते 50 हून अधिक मृत्यू होत होते. याची गंभीर दखल पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. मध्यरात्री रूग्ण ऑक्सिजन काढून शौचालयात जात होते. याकाळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू होत होता. ही बाब लक्षात येताच रुग्णांना बेडवर शौचासाठी लागणारे पॉट देण्याचे आदेश देण्यात आले.

जबाबदारी निश्चित -

कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना टीमवर्क म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याचे व्हिडिओ ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक व आजार असलेल्यांकडे विशेष लक्ष -

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 50 वर्षाहून अधिक वय असलेल्या तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याची दखल घेत 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे व 60 वर्षांवरील रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या रुग्णांची विशेष काळजी घेऊन मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल असेही मंगला गोमारे यांनी सांगितले.

आतापर्यंत 7 हजार 439 मृत्यू -

मुंबईत काल म्हणजेच 24 ऑगस्टला कोरोनाचे 743 नवे रुग्ण आढळून आले असून 20 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 37 हजार 91 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 439 वर पोहचला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात रोज 40 ते 50 मृत्यू होत होते. काल 20 मृत्यू झाल्याने मृतांच्या आकडेवारीत मोठी घट झाल्याचे दिसत आहे.


मृतांची आकडेवारी -

तारीख मृत्यू
24 ऑगस्ट 20
23 ऑगस्ट 34
22 ऑगस्ट 32
20 ऑगस्ट 46
1 ऑगस्ट 45
2 जुलै 57
1 जून 40

ABOUT THE AUTHOR

...view details