मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. तसेच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईतही ५ जुलैनंतरही तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. या परिपत्रकानुसार दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. सामान्य मुंबईकरांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट झाला कमी -
मुंबई महापालिकेच्या हद्दीत गेले दोन आठवडे ३.६६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट आहे. तसेच २३.१६ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. त्याआधी गेले दोन आठवडे ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट, तर २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका होता. २३.५६ टक्के बेडवर रुग्ण होते. मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या मागील आठवड्यापेक्षा कमी झाली आहे. तरीही मुंबईची भौगोलिक रचना व लोकसंख्या, लोकल ट्रेनने बाजूच्या जिल्ह्यातून दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात येणारे प्रवासी आणि टास्क फोर्सने अंदाज वर्तवल्यानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईमध्ये तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी रेट -
मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजार ५६९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी रेट ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्सपैकी २७.१२ टक्के बेड्सवर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त होते. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. मुंबईत २३.५६ टक्के बेडवर रुग्ण असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक द चेन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला होता. १८ ते २५ जून या कालावधीत गेल्या दोन आठवड्यात ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी रेट, तसेच २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते.