मुंबई - टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहेत. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी सध्या काम करत असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात आले आहे. मुंबईत 2 हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले आहे.
हंसा रिसर्च ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विशाल भंडारी या आरोपीची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये पाच व्यक्तींच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावल्याचे सांगितल. हे बॅरोमीटर लावत असताना त्याने एका विशिष्ट वाहिनीला दिवसभरात दोन तास चालू ठेवण्यास सांगितले. यासाठी विशाल भंडारी हा संबंधित लोकांना दर महिन्याला 400 रुपये देत होता.