मुंबई - कोरोनामुळे देशभर २५ मार्च नंतरच्या देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते, त्या प्रवाशांना परतावा नाकारणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यानुसार पर्यटन सहलींवरील परताव्याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण बुधवार, २४ जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीने एक ऑनलाईन सर्वेक्षण हाती घेतले आहे. ज्या पर्यटकांच्या देशांतर्गत वा परदेश सहली टाळेबंदीमुळे रद्द झालेल्या असतील त्यांना सहल कंपन्या त्यांचे पैसे परत करत आहेत किंवा अन्य काही पर्याय पर्यटकांना देत आहेत का? तसेच हे करताना त्यातून काही रकमा कापून घेत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी पर्यटक, प्रवाशांकडून यासंबंधीची माहिती या सर्वेक्षणातून मागवली आहे. सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संबंधित सरकारी यंत्रणेकडे याबाबत ग्राहकांना न्याय मिळवुन देण्यासाठी शासनाने सर्व पर्यटन कंपन्यांना मार्गदर्शक सूचना द्याव्यात यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आग्रह धरणार आहे.