मुंबई :बुधवारी 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून गोवंडी येथे कांग्रेसमार्फत एका दिवसाचे उपोषण ठेवण्यात आले होते. यावेळी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात घोषणाही करण्यात आल्या. तसेच, हे कायदे मागे घेण्याची मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली.
जय जवान, जय किसानच्या दिल्या घोषणा..
गोवंडी मधील शिवाजीनगर या ठिकाणी मानखुर्द -शिवाजीनगर विधानसभा कांग्रेस मार्फत एक दिवसाचे उपोषण ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून हे उपोषण ठेवण्यात आले होते. मोदी सरकारने जे कृषी कायदे मंजूर केले आहेत, त्या कायद्यांना संपूर्ण देशातून विरोध होत आहे. अनेक दिवसांपासून देशभरातून शेतकरी या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या समर्थनात आज हे एक दिवसीय उपोषण घेण्यात आले होते. यावेळी 'जय जवान, जय किसान' अशा घोषणा देत शेतकरी विरोधातील कृषी कायद्यांचा निषेध करण्यात आला.
शेकडो कार्यकर्ते उपस्थित..
ह्या उपोषणामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांनी हे उपोषण केले. याचबरोबर हा कायदा मागे घ्यावा अशी मागणीही यावेळी करणाऱ्यात आली. हा कार्यक्रम काँग्रेसचे माजी नगरसेवक वसीम जावेद खान यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नगरसेवक, माझी नगरसेवक विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.