मुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यात काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. आज मालाड येथे मुंबई काँग्रेसने चक्क रस्त्यावर चूल आणि हातगाडीवर रुग्ण ठेवत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी वाढत्या इंधन दराविरोधात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. जर पुढच्या काळात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतील, तर भविष्यात अशा प्रकारे रुग्णाला हातागाडीवरून घेऊन जावे लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकत्यांनी दिली.
मुंबई कॉंग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन हेही वाचा- महाविकास आघाडी मजबूत आणि स्थिर, नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
यावेळी मुंबई कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला. तसेच जर महागाई आणि इंधनाचे दर कमी झाले नाही, तर सतत सामान्य जनता रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याचे मुंबई काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. तसेच महागाईविरोधात 17 जुलैपर्यंत शहरातील 227 वॉर्डमध्ये निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, तर इंधन दरवाढीच्या विरोधात मुंबईतील 100 पेट्रोल पंपावर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे. याशिवाय 9 ते 14 जुलै या कालावधीत संपूर्ण मुंबईतील 6 जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे सायकल यात्रासुद्धा काढण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. या अभियानांतर्गत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजेच 227 वॉर्डमध्ये मुंबई काँग्रेसचे 10 कार्यकर्ते कोविड प्रभावित कुटुंबांना भेट देणार असून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. दररोज 10 प्रत्येकी काँग्रेस कार्यकर्ते 10 कुटुंबांना भेट देणार आहेत. हे अभियान 30 दिवस निरंतर सुरू राहणार आहे.
हेही वाचा -प्रेमभंग झालेल्या तरुणीला साडे चार लाखांचा गंडा घालणारा बंगाली बाबा गजाआड