मुंबई -भारतीय रेल्वेने 12 मे पासून स्पेशल पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. या रेल्वेगाड्या नवी दिल्लीतून देशातील 15 विविध शहरांपर्यंत धावणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातून 12 मे पासून नवी दिल्लीसाठी राजधानीच्या वेळेतच प्रति राजधानी स्पेशल एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेसला सुरत, वडोदरा, रतलाम आणि कोटा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
विशेष रेल्वे नवी दिल्लीतून दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी या शहरांमध्ये धावणार आहेत. या वातानुकूलित एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी असणार आहे. या स्पेशल रेल्वेसाठी प्रवाशांना आज दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे. मात्र, यासाठी रेल्वे स्थानकाच्या तिकिट काऊंटरद्वारे बुकिंग केले जाणार नाही.
प्रवाशांची जाण्यायेण्याची वाहतूक आणि रेल्वे स्थानकावर प्रवेश केवळ कन्फर्म ई-तिकीट असलेल्यांनाच मिळणार आहे. सर्व प्रवाशांचे वैद्यकीय स्क्रीनिंग करण्यात येईल. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच रेल्वेत चढण्याची परवानगी मिळेल. स्थानकांवर तसेच रेल्वेगाडीत स्वच्छता आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असणार आहे.
सर्व प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या इच्छित स्थानकांवर तसेच डब्यातही हॅन्ड सॅनिटायझर दिले जाईल. तसेच सर्व प्रवाशांनी मास्क घातले आहेत किंवा चेहरा झाकला आहे का? हे तपासले जाईल. सर्व प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर त्या संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी वेळोवेळी सल्लामसलत करून, रेल्वे मंत्रालय टप्प्याटप्याने रेल्वे वाहतूक सुरू करणार आहे.
एक्सप्रेसने प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत वरील नियमावली केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहे. त्यानुसारच प्रवाशांना प्रवेश दिला जाईल, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांनी सांगितले.