मुंबई- १२ पश्चिम रेल्वेवरील मुख्य स्थानक असलेले मुंबई सेंट्रल स्थानक आता नाना शंकरशेठ स्थानक या नावाने ओळखले जाणार आहे. लवकरच या स्थानकाचे नामांतर होणार असून गुरुवारी विधान भवनात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराजवळच्या मुरबाड इथे १० फेब्रुवारी १८०३ साली नाना शंकरशेठ यांचा जन्म झाला होता. अतिशय सधन कुटुंबात त्यांचे बालपण गेले. जगन्नाथ मुरकुटे, असे त्यांचे खरे नाव होते. मात्र, पुढे ते नाना शंकरशेठ नावानेच ओळखल्या जायचे. १९ व्या शतकातले मोठे उद्योगपती म्हणून नानांनी ख्याती मिळवली होती. नाना शंकरशेठ यांनी आपल्या मालमत्तेचा मोठा हिस्सा शहराच्या विकासासाठी दिला होता. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी जागा देखील दिली होती.
मुंबई शहर सुनियोजित करण्यासाठी त्यांनी तत्कालीन व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावली होती. शहरातील जे. जे. स्कुल ऑफ आर्ट, जे.जे. समूह रुग्णालय आणि एल्फिस्टन महाविद्यालयाच्या उभारणीत नानांचा मोठा सहभाग होता. शहरातील थोर समाजसुधारक सर जिजीभाई यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. सतीच्या चाली विरुद्धच्या कायद्याचे त्यांनी समर्थन केले. शिवाय स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार देखील घेतला होता. या थोर समाजसेवकाच्या नावाने शहरातील मध्यवर्ती स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत होती. ही मागणी आता पूर्णत्वास येणार असून सदर स्थानकाला त्यांचे नाव देण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.
हेही वाचा-परभणी आगारासाठी नवीन 18 बसेस देणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत माहिती