महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई मध्य रेल्वे विभागाने शून्य किंमतीत तयार केले 'यात्री' अ‍ॅप - Mumbai Central Railway Passenger App

मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या 'यात्री' अ‍ॅपचे सीएसएमटी येथे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून, हे ॲप विकसित केले आहे. याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी कौतुक केले.

मुंबई मध्य रेल्वे विभागाने शून्य किंमतीत तयार केले यात्री अ‍ॅप
मुंबई मध्य रेल्वे विभागाने शून्य किंमतीत तयार केले यात्री अ‍ॅप

By

Published : Jun 18, 2021, 5:50 PM IST

मुंबई - शून्य किंमतीत विकसित केलेल्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या 'यात्री' अ‍ॅपचे सीएसएमटी येथे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या हिताचा विचार करून, हे ॲप विकसित केले आहे. याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी कौतुक केले. या उपक्रमासाठी 5 हजार रुपयांचे रोख बक्षिसही त्यांनी दिले आहे.

'यात्री अ‍ॅपवर अनेक सुविधा'

महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी गुरूवारी सीएसएमटी येथे आयोजित केलेल्या सुरक्षेविषयी घेतलेल्या आढावा बैठकीत 'यात्री' अ‍ॅपची पहिल्या टप्प्यातील उपलब्ध वैशिष्ट्ये दाखविण्यात आली. याप्रसंगी वेब लिंकद्वारे विभागांचे प्रधान प्रमुख व इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. दरम्यान, 'यात्री' अ‍ॅपमुळे प्रवाशांना लाभ होणार असल्याने कंसल यांनी या अ‍ॅपचे कौतुक केले.

'प्लेस्टोअरवर अ‍ॅप उपलब्ध'

अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअरवर आता 'यात्री' अ‍ॅप उपलब्ध आहे. संबंधित प्लॅटफॉर्मवरून वापरकर्ते अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. स्टेशननिहाय सोयी-सुविधा, मुख्यलाईन स्थानकांवर ई-कार्ट बुकिंग करण्यास परवानगी, आवडत्या तसेच, नेहमीच्या गाड्या व मार्गांवर अलर्ट ठेवणे, रेल्वे नियम व दंड आणि रेल्वे आपत्कालीन क्रमांक याबद्दलची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध आहे.

'एनएफआर उपक्रमांतर्गत विकसित केले अ‍ॅप'

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआर आयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरु केले आहे. त्यातील एक योजना म्हणजे यात्री अ‍ॅप आहे. भविष्यात लोकल गाड्यांचा रिअल टाइम ट्रॅकिंगही ॲपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मध्य रेल्वे डिजिटल सर्व्हिस डिलिव्हरीची वेळ वाढविण्याच्या आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या तयारीत आहे. हे ॲप मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने नॉन-फेअर रेव्हेन्यू (एनएफआर) उपक्रमांतर्गत विकसित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details