मुंबई:मुंबईमध्ये महापालिकेचे तसेच कामगार क्रीडा मंडळाचे जलतरण तलाव आहेत. महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये याआधी नागरिक मोठया संख्येने येत होते. त्यानंतर आलेल्या कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे ही तलावे बंद करण्यात आली होती. या तलावांमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. पालिकेच्या दादर, चेंबूर, दहिसर, कांदिवली येथील जलतरण तलावात नोंदणी करण्यासाठी पालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि दैनंदिन सदस्य बनवण्यात येत आहे.
इतके आहे शुल्क:जलतरण तलावाचा वापर करण्यासाठी वार्षिक ८ ते १० हजार, त्रैमासिक २२०० ते २९००, मासिक १३०० रुपये, तर दैनिक २५० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. सदस्यांसोबत एखादा व्यक्ती पाहून म्हणून आल्यास त्याला २४० रुपये दैनिक शुल्क आहे. या तलावात सकाळी ६ ते ११, सायंकाळी ६ ते १०, महिला सदस्यांसाठी सकाळी ११ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. पूर्व सदस्यांना केवळ ४५ मिनिटे पोहता येत होते. आता या ६० मिनिटे पोहता येणार आहे.
लाईव्ह डॅशबोर्ड :पालिकेच्या जलतरण तलावात नेहमीच पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. यामुळे इतरांना त्यावेळी पोहता येत नाही. त्यांना काही काळ वाट पाहावी लागते. यासाठी तलावात किती लोक आहेत याची संख्या ऑनलाईन मिळावी यासाठी लाईव्ह डॅशबोर्ड तयार केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना किंवा सदस्यांना आपण कोणत्या वेळेत पोहण्यास जावे याचा निर्णय घेता येणार आहे अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.