मुंबई - भाजपचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे मंगळवारी निधन झाले. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष) यावेळी चंद्रकात पाटील म्हणाले, शेती, पाणी, सिंचन याबद्दल आत्मियता असलेला एक कर्तबगार नेता भाजपाने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दुःख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांचा आत्म्यास शांती देवो, असे पाटील म्हणाले.
हरिभाऊ जावळेंबद्दल -
हरिभाऊ जावळे जळगाव जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातून १९९९ साली सर्वप्रथम आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर २००७ साली लोकसभा पोटनिवडणुकीत ते जळगाव मतदारसंघातून निवडून गेले. २००९ साली पुन्हा एकदा त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी विजयी केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते रावेर मतदारसंघातून निवडून आले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. ते जळगाव जिल्ह्यातील फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनही होते. त्यांचा अनेक शिक्षण संस्थांशी निकटचा संबंध होता. केळीची शेती, सिंचन, पाणी, ग्रामविकास या विषयात त्यांनी आत्मियतेने काम केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही होते.