मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतही सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, अशी घोषणा करत आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपाने मुंबई येथे दादर चौपाटी ते चैत्यभूमी असा मोठा मोर्चा काढला.
राज्यातील माता भगिनींचा आवाज कुंभकर्णरुपी झोपलेल्या ठाकरे सरकारपर्यंत पोहोचवणे, तसेच या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. या सरकारला विद्यार्थ्यांची चिंता नाही, शेतकरी, श्रमिक, दलित, पीडित व्यक्तींची चिंता नाही. या सरकारला महाराष्ट्रातल्या माता-भगिनींचीही चिंता नाही, शरमेने मान खाली जाते, अशी टीका दरेकर यांनी केली.