मुंबई -बेस्ट उपक्रमाचे तिकीट दर कमी केल्यापासून सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण झाली आहे. बेस्टकडे सुट्ट्या पैशांची नाणी मोठ्या प्रमाणात जमा झाली आहेत. ही नाणी कर्मचाऱ्यांना पगारातुन दिली जात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे दीड हजार रुपयांची चिल्लर देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. निविदा प्रक्रिया रखडल्याने चिल्लर पगारातून दिली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बेस्टचे तिकीट दर ५, १०, १५, २० असे आहेत. त्यामुळे बेस्टकडे ५-१० ची पुष्कळ नाणी जमा होतात. ती संपवायची कशी? असा प्रश्न बेस्ट प्रशासनापुढे असतो. त्यामुळे बेस्ट प्रशासन तोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमा झालेली नाणी बेस्ट कामगारांच्या माथी मारण्याचा हा प्रकार असल्याचे एका बेस्टच्या उच्च स्तरीय कर्मचाऱ्याने सांगितले. सुट्ट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया रखडल्याने उपक्रमावर ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाने यापूर्वी भाडेकपात करत ५, १० रुपयाच्या टप्प्यात तिकीट दर जाहीर केले. तेव्हापासून सुट्ट्या पैशांचे डोंगर उपक्रमाकडे उभे राहत आहेत.