मुंबई Mumbai ATS : दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटनं रविवारी (७ जानेवारी) बोरिवली परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकला. या प्रकरणी एटीएसनं सहा जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
3 बंदुका, 36 जिवंत काडतुसं जप्त : एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. एटीएसनं सांगितलं की, "दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मुंबई युनिटनं मुंबईतील बोरिवली भागातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत". त्यांच्याकडून एटीएसने एक स्कॉर्पिओ कार आणि दरोड्यासाठी लागणाऱ्या वस्तूही जप्त केल्या आहेत. त्यांचा हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.
यांना केली अटक : शहादत हुसैन उर्फ कल्लू रहमत हुसेन असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो दिल्लीतील जामा मशिदीचा रहिवासी आहे. शहादत हुसेनवर खुनाचा गुन्हाही दाखल आहे. तो नुकताच तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. एटीएसनं दुसरा आरोपी अस्लम शब्बीर अली खान यालाही अटक केली असून तो ही दिल्लीचा रहिवासी आहे. शब्बीर अली खानलाही यापूर्वी खून आणि चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास सुरू : तिसरा आरोपी नदीम युनूस अन्सारी हा दिल्लीतील जामा मशिदीचा रहिवासी आहे. नदीमवर दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत. एटीएसनं नौशाद अन्वरलाही अटक केली. नौशाद हा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे. नौशाद अन्वर रेकी करण्यासाठी मुंबईत आला होता. पाचवा आरोपी आदिल खान चौकी हा गाझियाबाद, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी आदिल खान यानं आणली होती. पोलिसांनी सर्वांविरुद्ध मुंबईतील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात दरोड्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हे वाचलंत का :
- बिबट्याच्या कातडीची तस्करी; परतवाड्यात चार जणांना अटक
- मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक