मुंबई- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा निषेध देशभरातून केला जात आहे. कुठे पाकिस्तानचा झेंडा तर कुठे पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला जात आहे. तसेच जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर हुतात्म्यांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. लक्ष्मी गौड या महिला शिल्पकाराने वाळू शिल्प बनवून वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गुरुवारी जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४२ जवान वीरमरण आले. एकाच वेळी ४२ जवान हुतात्मा झाल्याने देशभरात आतंकवाद्यांच्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात पाकिस्तानचे झेंडे आणि पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जात आहे.
याचवेळी मुंबईच्या जुहू चौपाटीवर लक्ष्मी गौड या महिलेने १ टन वाळूचा वापर करत शिल्प बनवून त्याद्वारे जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सकाळी ८.३० वाजता हे शिल्प बनवण्यास सुरुवात केली, सायंकाळी ६ वाजता शिल्प बनवून तयार झाले. मी माझ्या कुटुंबीयांतर्फे या शिल्पाच्या माध्यमातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे गौड यांनी सांगितले.