नवी मुंबई -सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य खरेदी-विक्री व इतर गोष्टींना चांगलाच ब्रेक लागला आहे. बाजार समितीमध्ये दिवसाकाठी फक्त ५० ते १०० क्विंटल धान्य खरेदी होते आहे. शिवाय मालाला देखील उचल नसल्याने शेतकरी व व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सिजनमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्याने किमतीवर परिणाम -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेतमालाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात गडगडले, बहुतांश शेतमाल हा कोरोनाचे सावट व दुसरी लाट येण्यापूर्वी अनेक ठिकाणी म्हणजेच स्टेशन गाव शहर पातळीवर विकला जायचा मात्र कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने त्याचा मोठा फटका हा शेतमालाला बसला. बाजारसमितीत हा माल मोठ्या प्रमाणावर आल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर भाव गडगडले.
कोरोनाचा बाजारभावावर मोठा दूरगामी परिणाम -
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर फळांचा व भाज्यांचा मोठ्या प्रमाणावर सिजन होता.देशभरातून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे भाज्या कांदे बटाटे व इतर माल येतो, त्यामुळे याचा परिणाम मालाच्या किंमतीवर झाला. कोरोना काळाच्या पूर्वी ज्या मालाला ५० रुपये बाजार भाव मिळत होता. त्याला फक्त २० रुपये बाजार भाव मिळू लागला.
कोरोनामुळे शेतकरी व उत्पादकांचे नुकसान -
शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, मजूर व इतर गोष्टी यांना लागणारा खर्च पाहता, बाजारात मालाला उचल व किंमत न मिळाल्याने उत्पादक व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.