मुंबई Mumbai Airport :जगातील आणि देशातील अत्यंत गजबजलेलं विमानतळ म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. येथे पावसाळ्यानंतरच्या धावपट्टीची देखभाल करण्यासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार आहेत. त्यामुळं प्रवाशांनी घराबाहेर पडताना हे नियोजन पाहूनच आपला पुढचा प्रवास करावा.
दरवर्षी केली जाते धावपट्टीची दुरुस्ती :मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील रहदारी दिवसेंदिवस वाढलेली आहे. दररोज 950 पेक्षा अधिक विमानांची उड्डाण दोन्ही धावपट्टीवरून केली जातात. परंतु पावसाळ्यानंतर धावपट्टीवर अनेक प्रकारची देखभाल-दुरुस्ती गरजेची असते. मुंबईत पडणारा धो-धो पाऊस, यामुळं धावपट्टीची सक्षमता कमी होते. तसंच धावपट्टीवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. त्यामुळं विमानांच्या चाकांना त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच ही धावपट्टी नीट करण्यासाठी सहा तास दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवण्यात येणार आहे. मे 2023 मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण 43 लाख 43,806 प्रवाशांनी तेथे प्रवास केला. त्यापैकी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले प्रवासी 21 लाख 960 तर मुंबईहून विदेशात उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या 22 लाख 34,199 इतकी होती. अत्यंत गजबजलेल्या अशा या धावपट्टीवर पावसाळ्यानंतरची देखभाल दुरुस्ती ही दरवर्षी केली जाते. आणि यंदा देखील ती 17 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याचं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं सांगितलंय.