मुंबई Mumbai Air Pollution : मुंबई आणि दिल्लीत यंदा दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. आजूबाजूला विषारी हवा आणि धुक्यामुळं लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. सततच्या वाढत्या प्रदूषणामुळं लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं राज्य सरकारतर्फे काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यातच मुंबईतील वाहतूक पोलिसांनीदेखील मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगानं कंबर कसल्याचं बघायला मिळतंय.
मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाया :गेल्या तीन दिवसात 1013 वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 202/177 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शहरातील बांधकामासह इतर कामांसाठी आवश्यक त्या अवजड साहित्याची असुरक्षित धोकादायक वाहतूक केल्याप्रकरणी 7 नोव्हेंबरला 216 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी 492 तर 9 नोव्हेंबरला 3005 वाहनांवर याच प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसंच आठ वर्षांची फिटनेस मर्यादा संपलेली वाहनं ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडं पाठवलेली वाहनांची संख्या गेल्या तीन दिवसातील 59 असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान, या कारवाईत 7 नोव्हेंबरला 20 वाहने, 8 नोव्हेंबरला 31 वाहने तर 9 नोव्हेंबरला आठ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडं पाठवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
लायसन्समध्ये अनधिकृतपणे बदल केल्याप्रकरणी 449 वाहनांवर कारवाई : 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 2460 वाहनांवर पीयूसी कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाहनांच्या लायसन्समध्ये अनधिकृतपणे बदल केल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियम 194 (f) अन्वये गेल्या तीन दिवसात 449 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई 7 नोव्हेंबरला 71 वाहनांवर तर आठ नोव्हेंबरला 185 वाहनांवर त्याचप्रमाणे नऊ नोव्हेंबरला 193 वाहनांवर करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे.
उपाययोजना राबवण्यास सुरुवात : दिवसेंदिवस राज्यात प्रदूषणाचा वाढता धोका पाहता राज्य शासनामार्फत काही निर्देश जारी झाले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्हातील विविध शहरात उपाय योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हात विविध शहरांसह कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांचीच कामं सुरू आहेत. त्या बांधकामांमुळेदेखील वायू प्रदूषण होतंय. या अनुषंगाने बांधकामांना लागणारं साहित्य वाहतूक करताना ते ताडपत्रीनं ते झाकून आणावं, तसंच हे साहित्य जेव्हा बांधकाम साईटवर उतरवलं जातं, त्यावेळेस आजुबाजूला धूळ होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. दरम्यान, महानगरपालिकेच्या हद्दीत कुठल्याही प्रकारे कचरा जाळण्यात येणार नाही या अनुषंगाने सहाय्यक आयुक्तांना, उप अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
- Mumbai Delhi Pollution : मुंबई-दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी नियमित राखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज
- Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली; वायू प्रदूषणामुळं लहान मुलांना धोका? अशी घ्या काळजी
- Mumbai Air Pollution Issue: प्रदूषणापासून मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर आदेश