मुंबई Mumbai Air Pollution :मायानगरी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता सुधारला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हवेची गुणवत्ता सुधारली असून मुंबईकर आता मोकळा श्वास घेऊ शकतात. मात्र मुंबईच्या खराब हवेला जबाबदार असलेल्या नागरिकांसह विकासकावर गुन्हा दाखल करण्याचा सपाटा महापालिकेनं लावला आहे. महापालिकेनं दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकावर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईच्या हवेचा खालावलेला निर्देशांक सुधारला :मुंबईच्या हवेचा खालावलेला निर्देशांक आता सुधारू लागला आहे. दिवाळीच्या आठवड्यात मुंबईचा निर्देशांक प्रदूषणामुळे 250 ते 300 च्या दरम्यान पोहोचला होता. आता पुन्हा एकदा मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या उपाययोजनानंतर मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खाली आला आहे. यामुळे मुंबईकर आता काही अंशी मोकळा श्वास घेऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काय आहे मुंबईच्या हवेची गुणवत्ता :प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हवेचा निर्देशांक 116 च्या आसपास पोहोचला आहे. विभागवार पाहिलं असता मालाड मध्ये 73, कुलाबा इथं 74, घाटकोपर 78, बोरीवली 71, पवई 87, भांडुप 90, वरळी 95 आणि विलेपार्ले अंधेरी या भागात 98 इतका निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात वांद्रे मालाड बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स माजगाव या भागात हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली होती. मुंबईमध्ये वाहतुकीचे कमी झालेलं प्रमाण आणि दिवाळीनंतर धुराचं कमी झालेलं प्रमाण यामुळे हा निर्देशांक खाली आल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचं म्हणणं आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकावर कारवाई : मुंबईमध्ये महापालिकेनं प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली आहेत. यासाठी मुंबईतील अनेक बांधकाम प्रकल्पांना काम थांबवण्याची नोटीस दिली होती. 343 बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेनं कामं स्थगित करण्याची नोटीस दिली होती. मात्र असं असतानाही भारत रियालिटी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विकासाकडं बांधकाम नियमांचं उल्लंघन करून काम सुरूच ठेवलं. यामुळे हवेतील प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई महापालिकेनं या विकासकाविरोधात सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 291 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेनं बांधकामाच्या ठिकाणी पंचवीस फुटी पत्रे उभारून बांधकाम करावं, असं म्हटलं होतें. मात्र सदर विकासकानं याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं उपाध्याय यांनी सांगितलं. तत्पूर्वी महापालिकेनं संबंधित विकासकाला 354 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र तरीही सदर विकासकानं नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर ज्या बांधकाम प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांच्याकडून या नोटीसीचं उल्लंघन होते आहे का? याची वारंवार तपासणी करावी, असं विभाग अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
समुद्रात कचरा टाकणाऱ्यावर कारवाई :मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात कचरा टाकणाऱ्या नागरिकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नागरिकाला 10 हजार रुपयाचा दंडही महापालिकेनं ठोठावला आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या बाजुला एक नागरिक समुद्रात कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यामुळे महापालिकेनं तत्काळ कारवाई करत या नागरिकाला दंड ठोठावला. याबाबत तक्रार दाखल केल्यानं कचरा फेकणाऱ्या नागरिकावर गुन्हाही दाखल झाल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Mumbai Air Pollution Issue: प्रदूषणापासून मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कठोर आदेश
- Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली; वायू प्रदूषणामुळं लहान मुलांना धोका? अशी घ्या काळजी