मुंबई - नालासोपारा येथील स्फोटक आणि हत्यारांचासाठा बाळगणारा, तसेच 2017 च्या सनबर्न फेस्टिवल घातपाताच्या कटातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पश्चिम बंगालमधील उष्टी येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली. प्रताप उद्दिष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (वय - 34) असे या आरोपीचे नाव आहे.
मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2018 एटीएसकडून नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा प्रकरण तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिवल 2017 च्या घातपाती कटाबद्दल विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर प्रताप हाजरा हा फरार झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली होती. यातील बऱ्याच आरोपींना प्रताप हाजरा याने गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. यातूनच डिसेंबर 2017 मधील सनबर्नमध्ये घातपात घडविण्याचा कट रचण्यात आला होता. महाराष्ट्र एटीएसने 20 जानेवारीला आरोपी प्रताप हाजरा यास पश्चिम बंगालच्या एसटीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा -कंगना रनौतचं इंदिरा जयसिंगवर टीकास्त्र, म्हणाली अशा महिलांना....