मुंबई - राज्यात 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 11 जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 89 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई आणि परिसरात आढळलेल्या 14 नवीन रुग्णांपैकी 9 जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर 5 जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
13 मार्च 2020ला कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या 59 वर्षीय फिलिपाईन नागरिकाचा रविवारी रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले होते. म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता. तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.
हेही वाचा -' जागतिक अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर कोरोनाचा कायमस्वरुपी होणार परिणाम'
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा -
पिंपरी चिंचवड मनपा - १२
पुणे मनपा - १६
मुंबई - ३५
नवी मुंबई - ५
नागपूर, यवतमाळ, कल्याण - प्रत्येकी ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी - २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई, विरार - प्रत्येकी १
हेही वाचा -कोरोनाच्या लढ्याकरता वेदांत कंपनीकडून १०० कोटींचा निधी
एकूण रुग्णसंख्या - ८९, मृत्यू -२
राज्यात आज (सोमवारी) परदेशातून आलेले २५५ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. ज्यांना १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली, अशा २१४४ जणांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी १८८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य खात्यामार्फत आवाहन -
रविवारी राज्यभरात पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर पुणे-मुंबईमधील बरेच लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये काही करोना बाधित रुग्ण आढळलेले असले तरी या भागातून येणाऱ्या लोकांबद्दल विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही.
अनेक ठिकाणी वैद्यकिय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत, असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.
नुकतेच परदेशाहून आलेले काही नागरिक होम क्वारंटाईन न पाळता घराबाहेर पडताना दिसत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य हेल्पलाईनला प्राप्त होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्राचे विभागवार वाटप करुन प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार अधिकाऱ्याला होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी देऊन प्रत्येकजण नियमाप्रमाणे विलगीकरण सूचनांचे पालन करत आहे, याची खातरजमा करावी. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात यावी.
हेल्पलाईन क्र. राज्य नियंत्रण कक्ष - ०२०/२६१२७३९४, टोल-फ्री क्रमांक - १०४