महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवरात्रीनिमित्त 'मुंबादेवी'च्या मंदिरात आकर्षक सजावट, भक्तांनी फुलला मंदिर परिसर

आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. यानिमीत्त मुंबादेवी मंदिरात रविवारी सकाळी विशेष आरती करण्यात आली. तर, नवरात्रीनिमीत्त मंदिर परिसर दर्शनासाठी भक्तांनी फुलून गेला आहे.

नवरात्रीत सजले मुंबईच्या आराध्य 'मुंबादेवी' चे मंदिर

By

Published : Sep 29, 2019, 2:03 PM IST

मुंबई - मुंबईकरांचे आराध्य दैवत म्हणून मुंबादेवी प्रसिद्ध आहे. मुंबादेवीच्या नावावरूनच या शहराला मुंबई हे नाव मिळाले. मुंबईकर मुंबादेवीची मोठ्या मनोभावे पूजा करतात. या मंदिरात दिवसातून सहावेळा देवीची आरती केली जाते. आज (रविवार)पासून नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. यानिमित्त मुंबादेवी मंदिरात रविवारी सकाळी विशेष आरती करण्यात आली. तर, नवरात्रीनिमीत्त मंदिर परिसर दर्शनासाठी भक्तांनी फुलून गेला आहे.

नवरात्रीत सजले मुंबईच्या आराध्य 'मुंबादेवी' चे मंदिर


नवरात्रीत मंदिर पहाटे ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत नेहमीपेक्षा जास्त वेळ भक्तांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. नवरात्रीमध्ये देवीला जो साज सजविला जातो तो वर्षातून एकदाच केला जातो. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून केला जाणारा साज विशेष समजला जातो. तसेच या दरम्यान दिवसातून दोन वेळा देवीला श्रुंगार केला जातो. यावेळी देवीची मूर्ती व गाभारा पुर्णपणे फुलांनी सजवला आहे. देवीच्या या श्रुंगारासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागत असल्याची माहिती पुजाऱ्याने दिली.

हेही वाचा - मुंबईत नवरात्रोत्सवाला सुरूवात, देवी मातेचे उत्साहात आगमन
१६७५ साली बोरीबंदर येथे मुंबादेवीचे मंदिर उभारण्यात आले होते. त्यानंतर १७७३ मध्ये काही कारणास्तव हे मंदिर काळबादेवी येथे हलवण्यात आले. कोळी आणि आगरी बांधवांचे हे आराध्य दैवत आहे. येथील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाने मुंबादेवीला या ठिकाणी पाठवल्याची अख्यायिका आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने या देवीची पूजा केली जाते. शक्तीची देवता म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. तसेच मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी लोकं देशाच्या विविध भागातून येत असतात.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : मुंबईत आचारसंहितेच्या काळात 1 कोटीची रक्कम जप्त
डोळ्यातील वात्सल्य, चेहऱ्यावरील तेज, स्मित हास्य, कपाळावर चांदिचे मुकुट, चांदिच्या सिंहावर विराजमान आकर्षक अशा मुंबादेवीचा साजश्रृंगार डोळ्यांचे पारणे फिटणारा आहे. मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवीच्या चरणी माथा टेकण्याची इच्छा प्रत्येक भाविकाची असते. तसे वर्षाचे बारा महिने या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असतेच मात्र, नवरात्रीमध्ये भाविकांची झुंबडच उडत असते. यावर्षी देखील अशाच प्रकारची गर्दी उठणार असल्याची माहिती असून मंदिर प्रशासनातर्फे सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details