मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाल्यापासून संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी या कायद्याचा निषेध करण्यासाठी आंदोलने होत आहेत. दिल्लीमध्ये या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन झाले दरम्यान यामध्ये विद्यार्थी आणि पोलिसामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, मुंबईतसुद्धा या कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन होणार आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मुंबईत अनेक जण रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आज हे आंदोलन होणार आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानात होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून त्यासाठी सीआरपीएफ, राज्य राखीव दल, आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्यावर जातीने लक्ष घालतील, असे मुंबई पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. जिथे-जिथे आंदोलने होतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन कमेऱ्यांची नजर असणार आहे. तर उद्याची सर्व आंदोलने शांततेत पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष काळजी घेतलेली आहे.