मुंबई :प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर ( Famous poet and lyricist Javed Akhtar ) यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (Mulund Metropolitan Magistrate Court) जावेद अख्तर यांच्या विरोधात समन्स जारी केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.
प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश :या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने जावेद अख्तर यांना दिले असल्याने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे.