मुंबई- म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून पूर्ण खर्च केला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णाला राज्य सरकारकडून दीड लाखापर्यंत खर्च देण्यात येतो. मात्र या रोगावरचे उपचार महाग असल्याने याचा खर्च दीड लाखाच्यावर गेल्यास, तो खर्चही राज्य शासनाकडून केला जाईल असे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच या रोगावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च देखील राज्य सरकार उचलणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. यासाठी पिवळे, केशरी आणि पांढरे असे कोणत्याही रंगाचे कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य सरकरकडूनडॉक्टरांसाठी 90 पानी मार्गदर्शक तत्त्वे
म्यूकरमायकोसिसमुळे रुग्णाच्या कान, नाक घास आणि डोळ्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे या आजारावर प्रत्येक रुग्णालयात उपचार होणे शक्य नसल्याने यासाठी वेगळ्या विभागाची आवश्यकता असते. हे विभाग राज्यसरकरकडून तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी 90 पानी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आल्या आहेत. या गाइडलाइननुसार त्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ
राज्यात सध्या म्यूकरमायकोसिसचे पंधराशेच्यावर रुग्ण आहेत. त्यापैकी 500 रुग्ण उपचार झाल्यानंतर बरे झाले आहेत. तर 850 रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. म्यूकरमायकोसिसवर एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन प्रभावी आहे. मात्र या इंजेक्शनच्या उत्पादनावरील नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राला इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्याला 2 लाख एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनची गरज असून 1लाख 10 हजार इंजेक्शनची राज्याने ऑर्डर दिली आहे. हे इंजेक्शन 31 मे नंतर मिळतील, अशी माहितीही टोपे यांनी दिली. तसेच या इंजेक्शनसाठी राज्यसरकार ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी 17 जिल्ह्यातील जिल्हाधिकऱ्यांशी पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सवांद साधणार आहेत. त्यावेळी पंतप्रधानांना म्यूकरमायकोसिस आजाराची माहिती देऊन एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन बाबतीत मागणी करणार असल्याचही त्यांनी सांगितले.