मुंबई - महाराष्ट्रातील 25 किल्ले हेरिटेज हॉटेल, लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयावर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कडाडून टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्याने देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा आणि आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले असून, याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर.., असा इशारा त्यांनी दिला आहे.
'हा तर शिवबांचा, मावळ्यांचा अपमान; गड-किल्ल्यांना हात लावाल तर याद राखा' - ग्नसमारंभांसाठी
महाराष्ट्रातील गडकिल्ले विकासकांना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. शासन निर्णयात याला मान्यता मिळाली असून त्यावर विरोधकांनी कडाडून हल्ला चढवला आहे.
पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली राज्यातील 25 किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करणे, लग्न समारंभांसाठी ते भाड्याने देण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंडे यांनी कडाडून विरोध केला असून, गडकिल्ल्यांच्या ढासळत चाललेल्या बुरूजांमध्ये आजही इतिहास जिवंत आहे. महाराजांनी उभ्या केलेल्या गडकिल्ल्यांची निगा राखणे, त्याचे संवर्धन करणे सरकारला जमत नसेल तर ते करण्यासाठी महाराजांचे आमच्यासारखे लाखो मावळे आजही जिवंत आहेत. हेरिटेजच्या नावाखाली कुणाचा ही गोंधळ गडकिल्ल्यांवर होऊ देणार नाही, शिवभक्तांच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने ऐतिहासिक लाल किल्ला भाड्याने दिला, आणि त्यांचेच शिष्य आता राज्यातील किल्ले, विशिष्ठ संस्था आणि व्यक्तींच्या घशात घालायला निघाले आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे, विकासाच्या नावाखाली खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटन महामंडळाच्या मालमत्ता ज्यांच्या खिशात या आधीच टाकल्या आहेत त्यातून कोणता विकास झाला? याचे वाईट अनुभव असताना, काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणे असो, की गडकिल्ले भाड्याने देणे, हे निर्णय महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारे असल्याचे ते म्हणाले.