मुंबई MS Dhoni Winning Six :भारतात पुढच्या महिन्यापासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी रंगणार आहे. भारतात विश्वचषक होत असताना १२ वर्षांपूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं लगावलेला विजयी आयकॉनिक षटकार चाहत्यांना आजही स्मरणात आहे. आता भारतात पुन्हा एकदा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी होणार असल्याने याच आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं वेगळा उपक्रम हाती घेतलाय. १२ वर्षापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं लगावलेला तो विजयी षटकार ज्या खुर्च्यांवर जाऊन आदळला त्या खुर्च्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यात संपूर्ण सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितलंय.
भारताला विजयासाठी होतं २७५ धावांचं लक्ष्य : कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं १९८३ साली पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २८ वर्षांनंतर भारतातच झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज असताना, कर्णधार धोनीनं षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला होता. तो ऐतिहासिक षटकार आता कायमच यादगार राहणार आहे. त्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ५० षटकांमध्ये २७४ धावा करत श्रीलंकेनं भारताला विजयासाठी २७५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या सामन्यात भारताचा फलंदाजी क्रम अतिशय मजबूत होता. परंतु, सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरही १८ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर गौतम गंभीरनं ९७ आणि विराट कोहलीनं ३५ धावा करत सामना जिवंत ठेवला होता. याच सामन्यात धोनीनं आक्रमक पवित्रा घेत नाबाद ९१ धावा केल्या व भारताला विजय मिळवून दिला होता.
२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स :विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे ४९ वे षटक श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेकरा टाकत होता. या दरम्यान भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची आवश्यकता असताना धोनीने लाँग ऑनच्या दिशेने षटकार लगावत २८ वर्षाने भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात मुंबई-चेन्नई यांच्यातील आयपीएल लढती दरम्यान धोनी वानखडेवर उपस्थित होता. त्यावेळी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंनी धोनीनं लगावलेल्या विजयी षटकाराच्या त्या खुर्च्यांजवळ एक स्मृतीचिन्ह उभारण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र, आता तसं न करता या खुर्च्यांचा थेट लिलाव करण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. या खुर्च्यांना २०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स असं ओळखलं जाणार आहे.