मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गेल्या पाच ते सात वर्षांपासून प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या आधी कुठल्यातरी घोटाळ्यामुळे चर्चेत येते. याच्या बातम्या माध्यमात प्रसारित देखील झाल्या आहेत. यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या 'सेल टॅक्स' आणि 'पीएसआय' यासह इतर 40 विविध पदांच्या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करीत आहेत. सहा दिवसावंर ही परीक्षा आली आणि एका बनावट टेलिग्राम चॅनलवर एक लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड बेकायदेशीररित्या लिक झाले. ही बाब 'एमपीएससी'चे सदस्य देवानंद शिंदे यांना 'ईटीवी भारत'च्या वतीने लक्षात आणून दिली असता त्यांनी 'एमपीएससी' सहसचिव आणि सचिव यांच्याकडे कळवले. त्यानंतर आयोगाने खुलासा प्रसारित केला.
प्रश्नपत्र, सांख्यिकी डेटा सुरक्षित: 'एमपीएससी'च्या खुलाश्यानुसार टेलिग्राम चॅनेलद्वारे ऍडमिट कार्ड आणि काही इतर डेटा लिक झाल्याचे समजले आहे. याबाबत तात्काळ बाह्य लिंक बंद केली आहे. संदर्भात ज्यांनी याबाबत बेकायदेशीर कृत्य केले त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे; मात्र प्रश्नपत्रिका किंवा इतर सांख्यिकी डेटा लिक झालेला नाही. तसेच स्पर्धा परीक्षा पूर्व निर्धारित नियोजन पद्धतीने वेळेवर होईल, असे देखील अधोरेखित केले गेले आहे.
विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया: 'एमपीएससी' परीक्षेचेअॅडमिट कार्ड हे ओटीपी लॉगिन आणि पासवर्ड टाकून प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यक्तिगतरित्या उपलब्ध होते. तरी बाह्य लिंक दिल्यामुळेच अॅडमिट कार्ड टेलिग्राम चॅनलवर प्रसारित करता आले आणि विद्यार्थ्यांची खासगी माहिती सार्वजनिक केली गेली. या घोळामागे बाह्य लिंक देणेच कारणीभूत ठरल्याची बाब विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केली. 'ईटीव्ही भारत'च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे संपर्क साधला असता सहसचिव सुनील अवताडे यांनी खुलासा पत्र नुकतेच जारी केलेले आहे, असे सांगितले.